बेळगाव : व्हॉट्स ॲप स्टेट्समुळे उघड झाला २ कोटींच्या विमा पॉलीसीसाठी सुपारी हत्येचा प्रकार

पत्नी, तिचा प्रियकर, डॉक्टरांसह ९ जणांना अटक; प्रियकराच्या मदतीने पत्नीने रचला कट

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
16th June, 01:52 pm
बेळगाव : व्हॉट्स ॲप स्टेट्समुळे उघड झाला २ कोटींच्या विमा पॉलीसीसाठी सुपारी हत्येचा प्रकार

बेळगाव : कर्नाटकातील (Karnataka) बेळगाव (Belagavi) येथे माजी सैनिक संदीप मांजरगी (वय ४६) यांच्या मृत्यूमागील धक्कादायक मोठ्या कटाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सुरुवातीला अपघातानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे मानले जात असताना, तपासात हा खून असल्याचे उघड झाले. या प्रकरणात पत्नी, तिचा प्रियकर, डॉक्टर, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे (FSL) अधिकारी आणि इतर संशयितांसह एकूण नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

पत्नी व तिच्या प्रियकराने असा रचला खुनाचा कट

२०२५ मध्ये संदीप यांचा खून करण्याचा कट रचून पत्नी सुमा, तिचा प्रियकर पुंडलीक डोंबर या दोघांनी संदीप यांच्या नावे दोन कोटी रुपयांच्या एकूण तीन विमा पॉलीसी घेतल्या. त्यात एचडीएफसी बॅंकेच्या दोन तर एका एसबीआय बॅंकेच्या पॉलीसीचा समावेश होता. संदीप यांना दारूचे व्यसन असल्याने कधी तरी अपघातात मृत्यू पावणार असे पत्नीला वाटत होते. त्यातूनच खून करण्याचा कट रचून अंमलात आणण्यासाठी संधीची वाट पाहू लागली. संदीप यांना दुचाकी अपघात झाल्यानंतर इस्पीतळातील डॉक्टर, एफएसएल अधिकारी यांना हाताशी धरून खूनाचा कट प्रत्यक्षात आणल्याची माहिती बेळगावचे पोलीस अधीक्षक रामाराजन यांनी दिली. 

 व्हॉट्स ॲप स्टेट्समुळे उघड झाला खुनाचा कट 

खूनप्रकरणानंतर विम्याच्या रकमेवरून सुमा व प्रियकर पुंडलीक यांच्यामध्ये दरी निर्माण झाली व सुमा पुंडलीकला टाळू लागली. त्यानंतर पुंडलीकने याप्रकरणाचा माहिती देणारा व्हॉट्स ॲप स्टेट्स ठेवला आणि एकूण प्रकरण उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पत्नी, प्रियकर, डॉक्टर, एफएसएल अधिकारी यांना अटक 

याप्रकरणी पोलिसांनी पत्नी सुमा, पुंडलीक डोंबर (पत्नीचा प्र‌ियकर), त्याचा मित्र सचिन सेलर, डॉ. बसवराज भस्मे, एफएसएल अधिकारी पी. एम. नागराज, एफएसएल लॅब सहाय्यक चन्नप्पा अदवीस्वामीमठ,  एफएसएल कारकून अप्पासाब नाईकवाडी, अशोक गुजनल, पोलीस आयुक्त कार्यालयातील सहाय्यक यांना अटक केली आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, १३ मार्च रोजी संदीप मांजरगी यांचा दुचाकी अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना हुक्केरी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढे पत्नी सुमाने त्यांना घटप्रभा येथील जे. जी. को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये हलवले. त्या वेळी पोलिसांनी त्यांचा जबाबही नोंदवला होता. मात्र, संदीप यांनी अपघाताबाबत कोणतीही तक्रार दाखल करण्यास नकार दिला होता.

अपघातानंतर दोन दिवसांत संशयास्पद मृत्यू

अपघातानंतर अवघ्या दोन दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच अपघातातील गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचे कोणतेही संकेत आढळले नव्हते.

तपासात धक्कादायक माहिती उघड

तथापि, अपघातानंतर अचानक झालेल्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून नमुने एफएसएलकडे पाठवले. सुरूवातीला प्राप्त झालेल्या अहवालात विषबाधा नसल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, पुढील तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या.

विषारी पदार्थ मिसळलेल्या सलाईनद्वारे खून

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रेमसंबंध, विम्याची मोठी रक्कम आणि कौटुंबिक मतभेद यामुळे हा कट रचण्यात आला होता. विषारी पदार्थ मिसळलेल्या सलाईनद्वारे संदीप यांचा खून करण्यात आल्याचा संशय असून, पुरावे दडपण्यासाठी बनावट एफएसएल अहवाल तयार करण्यात आल्याचेही तपासात उघड झाले आहे.

 व्हॉट्स ॲप स्टेट्सवरील माहितीनंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि अखेर संपूर्ण कट उघडकीस आला. या प्रकरणामुळे वैद्यकीय यंत्रणा आणि फॉरेन्सिक विभागातील काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आणखी धक्कादायक खुलाशांची शक्यता

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा