८६ हजारांचा 'एमडीएमए' बाळगल्याप्रकरणी सिकेरीत कोल्हापूरच्या दोघांना अटक

गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून कळंगूट पोलिसांनी केली कारवाई

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
17th June, 04:41 pm
८६ हजारांचा 'एमडीएमए' बाळगल्याप्रकरणी सिकेरीत कोल्हापूरच्या दोघांना अटक

पणजी : उत्तर गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या सिकेरी येथील आग्वाद किल्याच्या म्युझियम परिसरात राबवलेल्या अमली पदार्थविरोधी मोहिमेत कलंगूट पोलिसांना मोठे यश आले. एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 'एमडीएमए' (MDMA) हा अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी महाराष्ट्रातील दोन तरुणांना अटक केली. जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे ८७ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईमुळे गोव्यातील किनारपट्टी भागात पर्यटनाच्या नावाखाली चालणाऱ्या ड्रग्जच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश पुन्हा एकदा झाला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, कळंगुट पोलीस स्थानकात एका गुप्त बातमीदाराकडून विश्वासार्ह माहिती मिळाली होती की, १६ जून २०२६ रोजी दुपारी ४:०० ते ४:३० वाजण्याच्या सुमारास सिकेरी येथील आग्वाद किल्ल्याच्या म्युझियम परिसरात दोन तरुण आपल्या संभाव्य ग्राहकाला अमली पदार्थांची डिलिव्हरी देण्यासाठी येणार आहेत. ही माहिती मिळताच कळंगुट पोलीस स्थानकाचे निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक सनिषा नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी तात्काळ आग्वाद म्युझियम परिसरात दबा धरून सापळा रचला. ठरलेल्या वेळेत संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडे बेकायदेशीररीत्या बाळगलेला 'एमडीएमए' हा सायकोट्रॉपिक ड्रग्जचा साठा आढळून आला. यामध्ये प्रणव नितीन वाळवेकर (वय २०, रा. सांगली नाका, इचलकरंजी, कोल्हापूर, महाराष्ट्र) याच्याकडे ३.४ ग्रॅम आणि शंतनू अशोक चौगुले (वय २३, रा. कोवाडकर मळा, निपाणी, महाराष्ट्र) याच्याकडे ५.३ ग्रॅम 'एमडीएमए' असा एकूण ८.७ ग्रॅम अंमली पदार्थ सापडला. पोलिसांनी हा संपूर्ण साठा जप्त करून दोन्ही आरोपींना तात्काळ अटक केली. महिला पोलीस उपनिरीक्षक सनिषा नाईक यांनी दिलेल्या अधिकृत तक्रारीवरून उपनिरीक्षक साईल वैगणकर यांनी संशयितांविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायदा १९८५ च्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

हे दोन्ही तरुण महाराष्ट्रातून गोव्यात केवळ ड्रग्ज विक्रीच्या उद्देशाने आले होते की ते येथील एखाद्या मोठ्या ड्रग रॅकेटचे केवळ दुवे आहेत, याचा सखोल तपास आता सुरू आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असून, हा अमली पदार्थांचा साठा त्यांनी कुठून आणला आणि गोव्यात तो कोणाला दिला जाणार होता, याचा मुख्य स्त्रोत शोधण्यासाठी त्यांची पोलीस कोठडीत चौकशी केली जात आहे. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर, पर्वरीचे उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या थेट देखरेखीखाली कळंगूट पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा