बर्च अग्नितांडवप्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल

सुरेंद्र कुमार खोसला, सौरभ-गौरव लुथरा, अजय गुप्ता, बिईंग जीएस हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. कंपनीचा समावेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th June, 06:17 am
बर्च अग्नितांडवप्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल

पणजी : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या आस्थापनांत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आग लागून २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मेरशी येथील विशेष (पीएमएलए) न्यायालयात ३,८२३ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. यात कथित जमीन मालक सुरेंद्र कुमार खोसला याच्यासह क्लबचे मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा, अजय गुप्ता आणि बिईंग जीएस हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. कंपनीविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

हडफडे येथील बर्च क्लबला ६ डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू, तर सहा जण जखमी झाले होते. या दुर्घटनेसंदर्भात हणजूण पोलिसांनी क्लबचे मालक व इतरांविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली. याच दरम्यान दुर्घटनेची गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेऊन सुनावणी सुरू केली. दरम्यान, बर्च बाय रोमियो लेनमध्ये मनी लाँड्रिग्चा संशय व्यक्त करून प्राथमिक कारवाई सुरू केली.

क्लबने अग्निसुरक्षा ना-हरकत प्रमाणपत्रासह इतर अनिवार्य परवानग्या नसतानाही कामकाज सुरू ठेवले होते. तसेच मार्च २०२४ मध्ये व्यापारी परवाना मुदतबाह्य होऊनही त्यांनी आपला व्यवसाय अव्याहतपणे चालू ठेवला. आर्थिक वर्ष २०२३-२४ ते ६ डिसेंबर २०२५ या कालावधीत या आस्थापनाने अंदाजे २९.७८ कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. ही रक्कम मनी लाँड्रिग कायद्याअंतर्गत गुन्ह्यातून मिळवलेली संपत्ती म्हणून निश्चित केली. बर्च दुर्घटनेतील संशयित लुथरा बंधू, सहमालक अजय गुप्ता, बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकर आणि माजी सरपंच रोशन रेडकर यांच्यासह इतर संशयितांचा ईडीने मनी लाँड्रिग प्रकरणी जबाब नोंदवला. त्यानुसार, ईडीने वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून २९.०५ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली. त्यानंतर ईडीने मेरशी येथील विशेष (पीएमएलए) न्यायालयात ३,८२३ पानी आरोपपत्र दाखल केले.

अॅड. तेरेस सिक्वेरा अॅमिकस क्युरी

हडफडे येथील बर्च क्लबला ६ डिसेंबर रोजी लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू, तर सहा जण जखमी झाले होते. या दुर्घटनेची गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेऊन सुनावणी सुरू केली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने अॅड. तेरेस सिक्वेरा यांची अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती केली आहे. 

आतापर्यंत २९ कोटींची मालमत्ता जप्त

* ईडीने या प्रकरणाशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे मारून महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली होती, तसेच ५९ लाख रुपयांचे बँक व्यवहार गोठवले होते.

* यापूर्वी ईडीने या प्रकरणात १७.४५ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्याचा आदेश जारी केला होता.

* आता नव्याने जप्त केलेल्या ११.०१ कोटींसह एकूण जप्त मालमत्ता २९.०५ कोटी रुपये झाली आहे. 

हेही वाचा