गोव्यात ३० जूनपासून 'आयटीएमएस' यंत्रणा होणार कार्यरत

नियम मोडल्यास थेट मोबाईलवर येणार दंडाचे चलन

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
17th June, 04:16 pm
गोव्यात ३० जूनपासून 'आयटीएमएस' यंत्रणा होणार कार्यरत

पणजी : गोव्यात 'इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम' (ITMS) अर्थात अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यासाठी राज्यातील २६ प्रमुख ठिकाणांची (जंक्शन्स) निवड करण्यात आली आहे. ३० जूनच्या मध्यरात्रीपासून ही यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित होईल. यानंतर वाहतुकीच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनचालकाच्या मोबाईलवर थेट दंडात्मक कारवाईचे (चलन) संदेश पाठवले जातील, अशी माहिती वाहतूक संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

'आयटीएमएस' ही दंडात्मक कारवाई करणारी संपूर्णपणे ऑनलाईन प्रणाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सेन्सर्स आणि 'कॉम्प्युटर व्हिजन' या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही यंत्रणा थेट (रिअल-टाइम) वाहतुकीवर आणि वाहनांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवेल. एखाद्या वाहनचालकाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास तेथील हाय-टेक कॅमेऱ्यांद्वारे त्याची तात्काळ नोंद केली जाईल. तसेच, नियम मोडल्याच्या पुराव्यासह (फोटोसहित) दंडाचे डिजिटल चलन थेट वाहन मालकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवले जाईल.

राज्यातील 'या' २६ जंक्शन्सवर असणार कॅमेऱ्यांची नजर : 

सुरुवातीच्या टप्प्यात ही आयटीएमएस यंत्रणा मेरशी, बिर्ला क्रॉस-वेर्णा, बेळ्ळे-नावेली, जुने मार्केट सर्कल-मडगाव, फातोर्डा, टाटा शोरूम-नुवे, गोवा सिरॅमिक्स-नुवे, गोरवटी-नुवे, नुवे बायपास, आर्ले सर्कल, बोळशें सर्कल-घोगळ मडगाव, मिसिंग लिंक-लोटली, नावेली, पॉवर हाऊस सर्कल-मडगाव, मुंज विहार सर्कल-मडगाव, टायटन-वेर्णा, आयएफबी-वेर्णा, रवी कॅफे-वेर्णा, चिखली पंचायत, बेताळभाटी, ग्रीन हाऊस-कोलवा, मारिया हॉल-बाणावली, आंबेडकर सर्कल-कुडचडे, तार-बस्तोडा म्हापसा, आकय-म्हापसा आणि धुळेर-म्हापसा या जंक्शन्सवर कार्यरत असेल.

वाहतूक नियमांच्या उल्लंघनासाठीचे नवीन दंडाचे दर खालीलप्रमाणे : 

* गाडी चालवताना मोबाईलचा वापर : पहिल्या गुन्ह्यासाठी १,००० रुपये, तर दुसऱ्या वेळेस थेट १०,००० रुपये दंड.

* वाहतूक सिग्नल किंवा चिन्हांचे उल्लंघन : पहिल्या वेळेस ५०० रुपये, तर दुसऱ्या वेळेस १,५०० रुपये दंड.

* सीट बेल्ट न लावणे किंवा हेल्मेट न वापरणे : पहिल्या व दुसऱ्या अशा दोन्ही वेळेस प्रत्येकी १,००० रुपये दंड.

* मर्यादेपेक्षा जास्त वेग (ओव्हर स्पीडिंग) : हलक्या वाहनांसाठी (LMV) १,००० रुपये आणि इतर मोठ्या किंवा व्यावसायिक वाहनांसाठी २,००० रुपये दंड.

* आणीबाणीच्या सेवांना (अॅम्ब्युलन्स, अग्निशामक दल) अडथळा आणणे : १०,००० रुपये दंड.

* नो पार्किंग किंवा अनधिकृत ठिकाणी वाहन उभे करणे : पहिल्या वेळेस ५०० रुपये, तर दुसऱ्या वेळेस १,५०० रुपये दंड.

* दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणे : १,००० रुपये दंड.

* धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करणे : पहिल्या वेळेस ५०० रुपये, तर दुसऱ्या वेळेस १,५०० रुपये दंड.

* वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने (रॉन्ग साईड) वाहन चालवणे : पहिल्या वेळेस ५०० रुपये, तर दुसऱ्या वेळेस १,००० रुपये दंड.

* धोकादायक किंवा रॅश ड्रायव्हिंग करणे : पहिल्या वेळेस १,००० रुपये, तर दुसऱ्या वेळेस १०,००० रुपये दंड.

* मालवाहू वाहनातून प्रवाशांची वाहतूक करणे : पहिल्या वेळेस ५०० रुपये, तर दुसऱ्या वेळेस १,५०० रुपये दंड.

* सदोष किंवा फॅन्सी नंबर प्लेट वापरणे : पहिल्या वेळेस ५०० रुपये, तर दुसऱ्या वेळेस १,५०० रुपये दंड.

मोबाईल क्रमांक अपडेट करण्याचे आवाहन

 वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचा तपशील आणि दंडाची माहिती विनाविलंब मिळवण्यासाठी सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनाची नोंदणी परिवहन खात्याच्या अधिकृत वेबसाईटवर तपासून घ्यावी. तसेच, ऑनलाईन पद्धतीने किंवा संबंधित प्रादेशिक वाहतूक कार्यालयात (RTO) प्रत्यक्ष जाऊन आपला चालू मोबाईल क्रमांक त्वरित अपडेट करावा, असे आवाहन वाहतूक खात्याकडून करण्यात आले आहे.  


हेही वाचा